जळगाव जामोद प्रतिनिधी ( विनोद वानखडे):-
नगर परिषद अंतर्गत जन्म व मृत्यू नोंद दाखले मिळविताना नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
साध्या जन्म व मृत्यू नोंदीसाठी नागरिकांना वारंवार नगर परिषद कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून, अनेक प्रकरणांमध्ये एकाच दिवशी दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जन्म-मृत्यू नोंद विभागात जर स्टाफची कमतरता असेल तर ती तातडीने भरून काढण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा मिळू शकेल.
तसेच ज्या नागरिकांची जन्म नोंद झाली नाही, अशा प्रकरणांमध्ये सात-आठ वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत. इतर नगर परिषद व ग्राम पंचायत क्षेत्रात अशा प्रकरणांमध्ये फक्त एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) किंवा अत्यल्प कागदपत्रांवर नोंद नाही चे दाखले दिली जाते, मात्र जळगाव जामोद येथे अनावश्यक कागदपत्रांची अट लावली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे की जन्म व मृत्यू दाखले एकाच दिवशी, सुलभ व मानवी दृष्टीकोनातून देण्यात यावेत तसेच जन्म नोंद नसलेल्या प्रकरणांसाठी एकसमान व सोपी प्रक्रिया तातडीने लागू करण्यात यावी.
जर नागरिकांना होणारा हा त्रास त्वरित दूर करण्यात आला नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी कांग्रेस पक्षाचे नेते बाबु भाई जमादार, अविनाश उमरकर, अमर पाचपोर,सय्यद अफरोज, अझहर देशमुख, डॉ शाकीर, भारसाकळे सर, सय्यद बहोद्दीन, अजय राजपूत, जुनेद शेख, हुसेन राही, इम्रान खान, मजीद जमादार, सय्यद अमीर, शारीक कैफ, हारीस भाईजी, शेख मोबीन, युनूस भाई, मुजाहीद मोमीन, शेख रिजवान, शेख नफीस व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
