पालघर प्रतिनिधी -रवि राठोड
पालघर
नडोरे देवखोप : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन नडोरे देवखोप ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
आबा पाडा वस्ती शाळेच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईमुळे प्रवासात असलेले प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेत नागरिकांची तहान भागावी आणि गैरसोय टळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक घटक असून, अशा लोककल्याणकारी उपक्रमांतून ग्रामपंचायतीची सामाजिक जाणीव स्पष्ट होते, असे प्रतिपादन केले.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रम नियोजनबद्ध व शांततेत पार पडला.
या वेळी सरपंच सोनल घोडके, उपसरपंच भरत घोडके, ग्रामविकास अधिकारी निलेश देवरे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
