पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
पालघर : सन २०१६ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा तब्बल दहा वर्षांनंतर शोध घेण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान वाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे ही महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.
सन २०१६ मध्ये वाडा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक २०/२०१६ नुसार दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्रवीण गोपीनाथ पवार (वय ३९), रा. पवारवस्ती , शेवगाव , ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे विक्रमगड येथे हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त वास्तव्यास होते. वाडा परिसरात असताना घरगुती वाद झाल्यानंतर मनस्तापातून त्यांनी कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता घर सोडले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांशी कोणताही संपर्क ठेवलेला नव्हता.
दरम्यान, पालघर पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ अंतर्गत हरवलेली मुले, महिला तसेच मनुष्य मिसिंग प्रकरणांचा नव्याने सखोल तपास सुरू करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वनवे व त्यांच्या पथकाने सदर प्रकरणाचा पुन्हा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यात प्रवीण पवार हे दिल्ली येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
तपासाअंती संबंधित व्यक्तीची खात्री करून त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर त्यांच्या नातेवाईकांची भेट घडवून आणण्यात पालघर पोलिसांना यश आले. हा क्षण कुटुंबीयांसाठी अत्यंत भावनिक ठरला.
ही उल्लेखनीय कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे , पोलीस उपनिरीक्षक वनवे तसेच वाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
