दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मंनधरणे
सोने-चांदीच्या झगमगाटाने जणू आभाळालाच गवसणी घातली असली, तरी या चकाकीने सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न मात्र दूर जात चालले आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत असल्याने आता सोने खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. परिणामी, ‘सोने नको रे बाबा’ असे म्हणत महिलांचा कल आता वन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांकडे झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.
गरिब कुटुंब असो वा श्रीमंत, प्रत्येक घरात सोन्याच्या दागिन्यांची हौस असतेच. विशेषतः महिलांसाठी सोने ही केवळ अलंकार नसून, प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. मकरसंक्रांत, नागपंचमी, हरितालिका, दिवाळी यांसारख्या सणांमध्ये महिलांकडून आवर्जून सोने खरेदी केली जाते. तसेच लग्नसराईच्या काळात तर सोन्याशिवाय विवाहाची जुळवाजुळवच पूर्ण होत नसल्याचे चित्र पूर्वी पाहायला मिळायचे. एकेकाळी अनेक विवाह हे पैशांपेक्षा सोन्याच्या दागिन्यांवर ठरत असत. गोरगरिब कुटुंबांमध्ये मणी, मंगळसूत्र आणि कानातील दागिन्यांवर समाधान मानले जात असे, तर सधन कुटुंबांमध्ये जडजवाहीरांची रेलचेल असायची. मात्र गेल्या दोन वर्षांत सोन्या-चांदीच्या
दरांनी प्रचंड उसळी घेतली आहे. सध्या सोन्याचा दर थेट तोळ्याला एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या पुढे पोहोचला असून, चांदीचा भावही तोळ्याला चार हजार रुपयांहून अधिक झाला आहे. या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय तर दूरच, पण श्रीमंत वर्गालाही दागिने खरेदी करताना अनेकदा विचार करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी आता पर्यायांचा मार्ग स्वीकारला आहे. कमी खर्चात आकर्षक दिसणारे वन ग्रॅम सोने, बाँटेक्स ज्वेलरी, कृत्रिम दागिने यांना मोठी मागणी वाढली आहे. लग्नसमारंभ, सण-उत्सव, हळद-कुंकू कार्यक्रम, सामाजिक सोहळे यासाठी देगलूर शहरासह तालुक्यातील महिलांकडून या दागिन्यांचा वापर केला जात आहे.
सोन्याच्या मर्यादित वापर गरजेचा
तज्ज्ञांचे मत आहे की, लग्नाच्या परंपरेत सोने महत्त्वाचे असले तरी आजच्या वास्तव परिस्थितीनुसार पर्यायी मार्ग स्वीकारणे गरजेचे झाले आहे. फॅशन ज्वेलरी किंवा मर्यादित सोन्याचा वापर करूनही परंपरा जपता येऊ शकते. यामुळे कुटुंब कर्जबाजारी होण्यापासून वाचू शकते आणि मुलींच्या सुखी संसाराचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते…
शिवराज चेंडके
श्री बालाजी इमिटेशन ज्वेलरी
देगलूर
