दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा मोहोळ प्रतिनिधी-बापू घळके
अनगर येथील श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, अनगर संचलित कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत ढोले सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. ते मुख्याध्यापक म्हणून 33 वर्ष सात महिने 21 दिवस एवढी प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत.
सर्वप्रथम स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले . मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षण प्रवाहातील आनंदयात्री या ढोले सरांच्या जीवनावरील गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले व यावेळी त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सपत्नीक सेवापुर्तीचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “मी या शाळेला अनेक वेळा भेट दिली आहे. गुणवत्ता, शिस्त व संस्कार यामुळे ही शाळा ओळखली जाते. ग्रामीण भागातील सर्वात मोठी शाळा म्हणून या विद्यालयाचा लौकिक आहे. ढोले सरांनी राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा उत्तम व आदर्श पद्धतीने चालवली असून अनेक सुसंस्कारित पिढ्या घडवण्याचे महत्त्वाचे कार्य या शाळेने केले आहे ग्रामीण भागात उत्तम शिक्षणाची सोय या शाळेने केली आहे.”
कार्यक्रमात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “ढोले सरांनी अतिशय निष्ठेने व समर्पित भावनेने काम केले आहे. ते एक उत्तम प्रशासक असून त्यांच्या या गुणवत्तेचा संस्थेने पुढील काळातही उपयोग करून घ्यावा,” असे मत त्यांनी मांडले.
यावेळी मारुती फडके उपायुक्त परीक्षा परिषद पुणे यांनीही ढोले सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व माजी आमदार राजन पाटील होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, “अवघ्या 27 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज 2315 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. शाळेच्या व संस्थेच्या विस्तारात प्राचार्य ढोले सरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या अंगी असलेली संस्थेप्रती निष्ठा व कामावरील श्रद्धा लक्षात घेऊन त्यांची संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात येत आहे,” अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी नियुक्तीचे अधिकृत पत्र ढोले सरांना प्रदान करण्यात आले.
प्राचार्य चंद्रकांत ढोले सर यांच्या सेवाकाळातील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तप्रियता, प्रशासन कौशल्य व विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन याचा सर्व वक्त्यांनी गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्या वतीने ढोले सरांचा सत्कार करण्यात आला.
हा सेवापूर्ती समारंभ केवळ निवृत्तीचा नसून एका यशस्वी शैक्षणिक प्रवासाच्या गौरवाचा सोहळा ठरला, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
यावेळी लोकनेते साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे,माजी प्राचार्य रंगसिद्ध दसाडे माजी प्राचार्य भिकाजी कुलकर्णी प्राचार्य सुधीर गायकवाड प्राचार्य बशीर बागवान प्राचार्य संजय करंडे माजी मुख्याध्यापक विश्वजीत लटके मुख्याध्यापक रामचंद्र पाटील मुख्याध्यापक संजय डोंगरे मुख्याध्यापक विश्वजीत देशमुख मुख्याध्यापक शिवाजी तळेकर आधी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.
