वैजापूर प्रतिनिधी / अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात काही कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांकडून युरियाची चढ्या दराने व सक्तीची विक्री केली जात असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने निश्चित करून दिलेल्या दरात युरिया विक्री करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात मात्र अनेक कृषी सेवा केंद्रांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
युरिया खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना,
“युरिया हवा असेल तर नॅनो युरिया घ्यावाच लागेल, शिवाय त्यासोबत दुसरे खतही घ्या, नाहीतर युरिया मिळणार नाही,”
असे स्पष्ट शब्दांत सांगितले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसतानाही नको असलेले नॅनो युरिया व इतर खतांची जबरदस्तीने खरेदी करावी लागत आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
सध्या रब्बी हंगाम सुरू असून युरियाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही कृषी सेवा केंद्रांकडून सक्तीची विक्री करून शेतकऱ्यांची उघड आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
विशेषतः अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांसाठी हा अतिरिक्त खर्च परवडणारा नसून, त्यांच्या शेती खर्चात मोठी वाढ होत आहे.
नियमांना हरताळ, प्रशासनाचे दुर्लक्ष?
शासनाच्या खत विक्रीसंबंधीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असताना देखील कृषी विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे कृषी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
