किशोरी पेडणेकरांचे वादग्रस्त विधान आणि मग घुमजाव !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव दिसतो. म्हणूनच बाबासाहेबांनी चांगला वर्तन करणारा नागरिक घडावा यावरच भर असलेले संविधान दिले, असे विधान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले.
या विधानामुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या असून त्यांनी तत्काळ माफीही मागितली.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या एका विधानामुळे त्या सध्या वादात सापडल्या आहेत. मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे अशी ठरावाची सूचना त्यांनी महासभेच्या पटलावर ठेवली आहे. या सूचनेचे समर्थन करताना पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही लहानपणी मनाचे श्लोकचा प्रभाव होता असे विधान केले.
इतिहासात असे कोणतेही दाखले नसताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्या चांगल्याच अडचणीत सापडल्या असून पेडणेकर यांनी तत्काळ याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
पेडणेकर यांची दिलगिरी
पेडणेकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. ‘मनाचे श्लोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे संविधान यांचा संबंध मी जोडला. यामुळे कोणाची मने दुखावली असतील तर मी माफी मागते. पण माझा उद्देशच वेगळा होता. चांगला नागरिक, मग तो कुठल्याही जाती-पंथाचा असावा, चांगला घडावा हेच संविधानात आणि मनाचे श्लोकमध्ये सांगितले आहे असे मला वाटते. पण कोणाची मने दुखावली असतील तर मी माफी मागते. पुन्हा असे विधान माझ्याकडून कधीच होणार नाही’, अशा शब्दात त्यांनी माफी मागितली.
सर्व शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे हवे
दरम्यान, मुंबईतील सर्व खाजगी, अनुदानित, पालिका शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करावे, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. येत्या महासभेत यावर चर्चा होणार असून सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रामदास स्वामींनी साध्या, सोप्या व अनुदुस्त छंदात रचलेले मनाचे श्लोक हे विद्यार्थी दशेतील मुला-मुलींसाठी काळाची गरज असून, शाळांमध्ये मनाचे श्लोक म्हणण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या मानसिक, नैतिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थीदशेतील मुला-मुलींवर शालेय जीवनातच मनाच्या श्लोकांचे अंकुर रुजविल्यास, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सर्वसामान्य जीवन जगताना येणारे नैराश्य व वाईट विचारांपासून त्यांना दूर ठेवता येईल. त्यामुळे ‘मराठी भाषा’ हा विषय सक्तीचा असलेल्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित शाळा यामध्ये मनाचे श्लोक म्हणण्यासाठी दैनंदिन दिवसात एक तासिका सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
