दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई —लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, अशी आग्रही मागणी लिंगायत समाजाच्या वतीने मागील काही वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती, या मागणीसह विविध प्रश्नांवर वेळोवेळी निवेदने दिली, विविध आंदोलने ही करण्यात आली.
बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद सिद्रामप्पा पोखरकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन त्यांना दिले होते. तसेच सदर मागण्यांसाठी बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाज बांधवांना एकत्रित करून मुंबईत मोठे आंदोलन ही केले होते. या मागणीला आता यश आले असून लिंगायत समाजातील तरुण, सुशिक्षित बेरोजगार व नवोद्योजकांना स्वयंउद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे, त्यानुसार नव्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रूपये निधी मिळणार आहे. हा निधी कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणार आहे. या निर्णयाचे संपूर्ण लिंगायत स्वागत करत आहे.
