दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा मोहोळ प्रतिनिधी-बापू घळके
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मोहोळ पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी भाजपचे युवा नेते मा. अजिंक्यराणा (रावसाहेब) पाटील यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या विषयावरून उमेश पाटील यांनी जाणीवपूर्वक चुकीचा नरेटिव्ह पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. निवडणुकीच्या काळात राजकीय स्वार्थासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवणे चुकीचे असून, यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
“अशा प्रकारच्या विधानांवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,” अशी ठाम मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच, प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, तर आगामी काळात भारतीय जनता पक्ष व कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे, संतोष वायचळे, मुस्ताक शेख, प्रमोद डोके, नागेश बिराजदार, राजेश सुतार, योगेश ओहळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
