दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील व्यापारी शेठ झाला, व्यवसाय करणारा उद्योजक झाला, नोकरी करणारा साहेब झाला अन् जगाचा पोशिंदा वर्षाच्या शेवटाला थकबाकीदार झाला…’ असा मजकूर असलेली पोस्ट सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. काळजाला भिडणाऱ्या या मजकुराचा विचार केला तर खरेच जगाचा पोशिंदा म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था वर्षानुवर्षे वर्षाच्या शेवटाला अशीच पाहावयास मिळते. या पोस्टने पुन्हा एकवेळ शेतकऱ्यांचीदयनीय स्थिती चव्हाट्यावर आली आहे.
शेतकरी मोठ्या कष्टाने, जिद्दीने शेतात राबत असतो. घेतलेल्या पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज घेत भविष्यातील कर्जाचा हिशेब चुकता करण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र, या कष्टाला अनेकवेळा निसर्गाची अवकृपा, दुष्काळाची छाया, रोगांचा प्रादुर्भाव, अशा दुष्टचक्रांची नजर लागते. तथापि, या सर्वांवर मात करून मोठ्या कष्टाने, जिद्दीने हा शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये राब राब राबून काळ्या आईच्या उदरातून पिकांच्या माध्यमातून सोने, मोती आणि हिरे पिकवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षातील सोन्या-चांदीचे, मोत्यांचे किंवा हिऱ्याचे दरदिवसेंदिवस गगनाला भिडत असताना शेतातून पिकवलेल्या सोन्यासारख्या मालाचे दर तथा भाव ठरविण्याचा अधिकार त्या बळीराजाला नसल्याने कधी कवडीमोल किमतीत, तर कधी तोट्यात शेतमाल त्याला विकावा लागतो.
अलिकडच्या काळात सरकारच्या माध्यमातून हमीभाव देऊन न्याय देण्याचा केलेला प्रयत्न तोकडा पडतो. कारण, यावर शासन यंत्रणा काटेकोरपणे लक्ष देत नाही. दुसरीकडे उत्पादित केलेल्या इतर वस्तूंचे दर, त्यांची निश्चित केलेली किंमत उत्तरोत्तर वाढताना दिसते. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना मुला-बाळांचे शिक्षण तसेच मुलांचे लग्न करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येते. यासाठी काढलेल्या कर्जामुळे बळीराजा कायम कर्जाच्या डोंगराखाली दबलेला दिसतो. एकूणच, वर्षाच्या शेवटाला व्यापार, व्यवसाय करणारा, नोकरी करणारा यांच्या हिशेबाच्या वहीच्या सातबाऱ्यावर कधीच वजाबाकी
न होता बेरोजच झालेली असते, तर जगाचा पोशिंदा म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची किंमत ग्राहक ठरवत असल्यामुळे त्याचा सातबारा मात्र कर्जाच्या आकड्यांमुळे सातत्याने भरलेला दिसतो, हे मात्र नक्की!
तेव्हाच सोनू तुझ्यावर माझा भरवसा !
कष्टकरी शेतकरी, धरणीमातेचा लाडका
भूक भागवतो साऱ्यांचीच, घेऊन शेतीचा उरी वसा त्याच्या शेतमालाच्या किमतीचा नाही भरवसा ज्या वेळी त्याला शेतमालाच्या किमतीचा मिळेल भरवसा तेव्हाच सोनू तुझ्यावर माझा भरवसा..!
बळीराजाची व्यथा सरकारला दिसत नाही का?
सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या माय-बाप सरकारकडून आश्वासनांची पूर्तता कधीच होत नाही आणि बळीराजाच्या सातबाऱ्यावरील कर्जाच्या आकड्यांची संख्या कधीच कमी होत नाही, हे विदारक दृश्य सातत्याने पाहावयास मिळते. त्यामुळे ‘जगाचा पोशिंदा’ अशी बिरुदावली असणाऱ्या शेतकरीराजाची व्यथा मात्र मायबाप सरकारसह समाजाला का दिसत नाही? असा सवाल उपस्थित होतो.
