दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी – समिर शिरवडकर.
राजापूर:- ( राजापूर) ऐतिहासिक राजापूर शहरातील सहकारी तत्त्वावर काम करणाऱ्या एका प्रतिथयश बँकेमध्ये करोडोंचा घोटाळा झाला असल्याची माहिती मिळत आहे. या घोटाळ्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वस्तुस्थिती खरी असल्याचे आणि अशी अनेक प्रकरणे असल्याचे समजले.या प्रकरणांमध्ये संबंधित शाखाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.सदर घोटाळा हा शाखाधिकारी यांनी एकट्यानेच केला असल्याचे संचालक मंडळासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परंतु सर्वसामान्य सभासदांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता असे घोटाळे हे एकट्या दुकट्याने होत नाहीत तर संस्थेच्या नावाप्रमाणे सहकार्यानेच होत असल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. बँकेचे वरिष्ठ अधिकारी सदर घोटाळा हा एकट्या शाखाधिकारी यांनी केला आहे असे वारंवार सांगून नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल सभासदांच्या मनात उत्सुकता असल्याचे काही सभासदांनी बोलून दाखवले.
कर्ज वाटप एकट्या शाखाधिकार्यांनी केले असले तरी बँकेच्या ऑडिटमध्ये सुद्धा हा घोटाळा उघड का झाला नाही? बँकेचे लोन डिपार्टमेंट, रिकव्हरी ऑफिसर, बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच संचालक मंडळ यांची नक्की भूमिका काय असते याबाबत सामान्य सभासद अनभिज्ञ असल्याचे जाणवले.सदर घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी बँकेकडून एक चौकशी समिती नेमली असल्याचे कळले. ही चौकशी समिती सुद्धा स्वतंत्रपणे आणि कोणाच्याही, कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले काम प्रामाणिकपणे आणि चोखपणे बजावणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
