राज्यात पावसाचे थैमान सुरूच असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला.
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.
१६६ मंडळात अतिवृष्टी
राज्याच्या १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी अतिवृष्टी झाली. रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्हयांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. खडकवासल्याबरोबरच इतर काही धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. रायगडमधील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनवेल तालुक्यातील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेण तालुक्यामधील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यातील माणगाव, इंदापूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली. याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली.
पुण्यात विमान सेवा विस्कळीत
पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे अनेक रस्ते जलमय झाले. दिवे घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. थेऊर येथील ओढ्याला पूर आल्याने अडकलेल्या ७० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. खराब वातावरणाचा विमान सेवेला फटका बसला. त्यामुळे १४ विमाने अहमदाबाद, हैदराबाद, सुरत, मुंबई या विमानतळांवर उतरविण्यात आली, तर विमानतळावरून उड्डाण घेतलेली तीन विमाने पुन्हा माघारी पाठविण्यात आली.
आष्टीमध्ये मदतीसाठी हेलिकॉप्टर
सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातले असून पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जनजीवन विस्कळीत झाले. आष्टी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिक येथून लष्कराला पाचारण करावे लागले. त्यांनी ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले.
मुंबईत अनेक ठिकाणी पाणी
सोमवारी बरसलेल्या पावसामुळे सक्कर पंचायत, महालक्ष्मी जंक्शन, सीजे हाऊस वरळी, संगम नगर वडाळा येथे, तर पूर्व उपनगरात कुर्ला मार्केट, टेंबी ब्रिज, कुर्ला रेल्वे स्थानक, घाटकोपरमधील वेलकम हॉटेल समोरील परिसर, जुहू सर्कल, पाणबाई जंक्शन सांताक्रुझ, नॅशनल महाविद्यालय आदी विविध भगांमध्ये पाणी साचले होते. जोरदार पावसासह सोमवारी सकाळी ५.५१ च्या सुमारास समुद्राला आलेल्या भरतीमुळे पाणी अधिक तुंबले, असा दावा पालिकेने केला आहे.
