सटाणा (नाशिक) : अमोल बच्छाव :
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथिल शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुल्लेख करुन त्यांचे राष्ट्राप्रती असणारे योगदान नाकारण्याचे एकप्रकारे कुत्सित मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. या कृत्त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या घटनेच्या निषेधार्थ सटाणा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतिने गिरीष महाजन यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले, गिरीष महाजन यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बागलाण तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे म्हणजे राष्ट्रद्रोही कृती आहे. या त्यांच्या कृत्याबद्दल संविधान संवर्धक भगिनींनी आक्षेप घेतला असता, त्यांना पोलीसांकरवी ताब्यात घेण्याचा संतापजनक प्रयत्न देखील करण्यात आला. हा प्रकार भारतीय जनतेच्या वैचारीक प्रगल्भतेचा; तसेच अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा संकोच करणारा असून राज्याच्या फॅसिष्ट कार्यप्रणालीचे दर्शन घडविणारा आहे. या घटनेसंदर्भाने संबंधित भगिनींना कुठलाही त्रास होता कामा नये याची दखल आपणामार्फत घेण्यात यावी असेही या निवेदनात मांडण्यात आले.
ज्या राष्ट्रद्रोह्यास संविधान आणि संविधानाच्या निर्मात्याचे योगदान मान्य नाही त्याला संविधानानुसार स्थापित झालेल्या मंत्रीमंडळात राहण्याचा काहीही अधिकार नाही. असे म्हणत जनभावना लक्षात घेता गिरीष महाजन यांचा राजीनामा घेऊन, मंत्रीपदावरुन दूर करण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी योगेश साळवे, साजन गायकवाड, दिनेश निकम, जय जगताप, मच्छिंद्र काकळीज, कैलास अहिरे, समाधान गरुड, तेजस उशिरे, ह्रतिक गायकवाड, स्वप्निल गांगुर्डे, राहूल बच्छाव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
