UN मध्ये मतदान होऊ शकले नाही; उद्यावर ढकलले…
मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘होर्मुजच्या सामुद्रधुनी’ बाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत होणारे मतदान आता शनिवारी होणार आहे.
बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होणे अपेक्षित होते, परंतु चीनच्या विरोधामुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट पावर प्लांट आणि पूल उडवण्याची धमकी देऊन युद्धाचा भडका उडवला आहे.
UN मध्ये का रखडले मतदान?
बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावाचा मुख्य उद्देश होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करणे हा आहे. या प्रस्तावानुसार, देशांना आपल्या जहाजांच्या रक्षणासाठी आवश्यक ते ‘संरक्षणत्मक उपाय’ करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, चीनने यातील ‘बळाचा वापर’ करण्याच्या तरतुदीला विरोध दर्शवला आहे. चीनच्या मते, यामुळे या क्षेत्रात लष्करी हस्तक्षेप वाढून परिस्थिती अधिक बिघडू शकते. यामुळे शनिवारी हा प्रस्ताव पारित होण्याची शक्यता मावळली आहे.
ट्रम्प यांचा ‘पॉवर’फुल इशारा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा खळबळजनक इशारा दिला आहे. “आमच्या सैन्याने अद्याप इराणमध्ये पूर्ण ताकदीने कारवाई सुरू केलेली नाही. येणाऱ्या काळात इराणचे महत्त्वाचे पूल आणि वीज प्रकल्प आमचे पुढचे लक्ष्य असू शकतात,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती देशांमध्ये युद्धाची भीषणता वाढण्याची चिन्हे आहेत.
अँटोनियो गुटेरेस यांची शांततेसाठी साद
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. “उध्वस्त करून नव्हे, तर संवादानेच प्रश्न सुटतील,” असे सांगत त्यांनी आपला विशेष दूत जीन अर्नाल्ट यांना शांती चर्चेसाठी नियुक्त केले आहे. त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली आहे.
