दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : ‘अडीच वर्षे महाराष्ट्राचं सरकार हाती असलेली मंडळी आता वेदांता फॉक्सकॉन आणि उद्योगांवरून भाजपवर टीका करत आहेत. मात्र, याच शिवसेनेच्या काळात अडीच वर्षे शिवसैनिकांसाठी मातोश्रीची आणि गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राची दारं बंद होती.
त्यामुळे आपल्या सरकारच्या काळात काहीही न करणाऱ्यांनी भाजपवर टीका करू नये, या शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
भाजपतर्फे लोकसभा २०२४ अनुषंगाने राबविण्यात ‘लोकसभा प्रवास दौऱ्यासाठी येत ठाकूर हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या कारभाराचे वाभाडे काढले.
अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘फॉक्सकोन वेदांता प्रकल्पावरून भाजपला विनाकारण टार्गेट केले जात आहे. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा उद्योजकांना कशाप्रकारे टक्केवारी मागितली जात होती हे सर्वश्रुत आहे. तत्कालीन सरकारच्या कारभारामुळे अनेक उद्योजक आल्या पावली परत गेलेले आहेत हा इतिहास कुणीही विसरणार नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्यात पुन्हा एकदा उद्योगांना अच्छे दिन येणार असून येत्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक झालेली असेल,’ असा विश्वासही अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
