दैनिक चालु वार्ता कोल्हापूर चंदगड-संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी :- गेले नऊ महिने बंद असलेल्या तिलारी घाटातून अखेर बुधवारी एस टी बस घावली. सकाळी कोल्हापूर विभागाची कोल्हापूर – दोडामार्ग- पणजी पहिली एस टी बस सुरु झाल्यामुळे सर्वांच्या मनात एकच आनंद होता. तालुक्यातील सर्व नागरिकांनी श्री प्रवीण गवस, श्री अंकुश गावडे, श्री अंकुश गवस यांचे मनापासून आभार मानले.
तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत एस टीसह अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिले होते. त्यामुळे येथील नागरिक प्रवासी तसेच शाळकरी मुले यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे स्वराज्य सरपंच संघटनेचे जिल्हाघ्यक्ष श्री प्रवीण गवस माजी सरपंच श्री अंकुश गावडे, माजी सरपंच अंकुश गवस श्री. दत्ताराम देसाई, व सर्व सरपंच, उपसरपंच व नागरिक यांनी वारंवार निवेदन, उपोषण, आंदोलन, या सारखे विषय हाती घेऊन तिलारी घाटातून तात्काळ एस टी वाहतूक सुरु करावी अशी मागणी केली होती. कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी म्हटले होते की तिलारी घाटातून अवजड वाहतूक करण्यास योग्य नाही. संरक्षक कठडे काही ठिकाणी कोसळले आहेत असे पत्र एस टी महामंडळाला दिले होते त्यानंतर एस टी महामंडळाकडून सदर रस्त्याची डाग डुजी करून संरक्षक कढडे बांधून रस्त्या वाहतूकीसाठी सुरळीत होतं नाही तो पर्यंत एस टी बस सेवा सुरु करण्यात येणार नाही असे म्हटले होते.
त्यानंतर मा. प्रवीण गवस व त्यांचे सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे वारंवार मागणी केल्यानंतर सदर घाट रस्त्यातील संरक्षक कठडे बांधून डाग डुजी करण्यात आली असे पत्र एस टी महामंडळाला दिल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले.
तिलारी घाटातून बुधवारी तिलारी- दोडामार्ग मार्गे गोव्याला जाणारी कोल्हापूर- दोडामार्ग- पणजी अशी पहिली एस टी बस कोदाळी येथे आली त्या ठिकाणी एस टी चालक श्री संताजी देसाई व वाहक श्री संतोष गभाले यांना फेटे बांधून श्री माऊली देवीची प्रतिमा व पुष्पहार देऊन तसेच श्री माऊली मंदिरच्या समोर एस टी बसची पूजा व हार घालून जंगी स्वागत कारण्यात आले. या वेळी स्वराज्य सरपंच संघटनचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण गवस, माजी सरपंच श्री अंकुश गावडे, माजी सरपंच श्री अंकुश गवस, सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण गावडे, कोदाळी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. योगिनी दळवी, उपसरपंच श्री विठ्ठल गावडे, जेष्ठ नागरिक श्री शंकर गावडे, श्री अर्जुन गावडे, श्री रामचंद्र गावडे, माजी सदस्य श्री संतोष दळवी, माजी सदस्य श्री विलास कांबळे, व श्री माऊली ग्रुप व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी एस टी बसचे स्वागत केले बऱ्याच महिन्या नंतर एस टी बस चालु झाल्याने शाळकरी मुलांनी हि आनंद घेतला.
तिलारी घाटातून एस टी बस सेवा सुरु झाली पाहिजे यासाठी कोल्हापूर येथे एक दिवशीय उपोषण केले, तिलारीनगर येथे दोन तास रास्ता रोको, आंदोलन केले या शिवाय एस टी बसेस सुरु झाल्या पाहिजे यासाठी गडहिंग्लज प्रांताधिकारी, चंदगड तालुक्याचे आमदार मा. शिवाजीराव पाटील साहेब कोल्हापूर जिल्हाचे तात्कालीन पालकमंत्री व विद्यमान मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या भेटी घेतल्या होत्या.
