नेमकं काय घडलं ?
मागील काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधाने करत असल्याने चर्चेत आहेत. शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी विचारले असता तुम्ही त्या पैशाने लग्न, सुखारपुडे करता असे अजब विधान कोकाटेंनी केले होते.
त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. आता माणिकराव कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा सामान करावा लागल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इतर सगळे नेते वेळेत पोहोचले होते. मात्र, या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धातास तब्बल उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांना पाहाताच अजित पवारांचा पारा चढला. आणि त्यांनी कोकारटेंना खडे बोल सुनावले.
मराठी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तीनुसार, सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणे, बेशिस्त वर्तणूक, पक्ष कार्यालयातील जनता दरबाराला हजर न राहणे अशा अनेक कारणामुळे अजित पवारांनी कोकाटेंवर रागावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठकी विषयी अजित पवारा यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. प्रत्येकाच्या मतदासंघातील विकास कामांचा आढावा घेतला. निधीअभावी कामं रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.
कोकाटेंनी मागितली माफी
माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानाविषयी यू टर्न घेत जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले मस्करीची कुस्करी झाली. माझ्या वक्तव्याने शेतकऱ्यांचा सन्मान दुखावला गेला असेल तर मी माफी मागतो.
