जाणून घ्या पाकिस्तानचे किती होणार नुकसान ?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. भारत सरकारने अटारी चेक पोस्ट (ICP) तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे.
या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणारे लोक १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात, परंतु हा मार्ग केवळ एका निश्चित कालावधीसाठी खुला राहील.”
दरम्यान, या निर्णयाचा भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर काय परिणाम होईल? यांची चर्चा सर्वत्र होत आहे. एक इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, अटारी सीमा हा एकमेव जमीनी मार्ग आहे ज्याद्वारे दोन्ही देशांमधील व्यापार होतो. भारत या मार्गाने पाकिस्तानला सोयाबीन, चिकन फीड, भाज्या, प्लास्टिकचे कण, प्लास्टिकचा धागा आणि लाल मिरची यासारख्या वस्तू पाठवतो.
अटारी-वाघा सीमेवरून ३,८८६.५३ कोटी रुपयांचा व्यापार
अमृतसरपासून फक्त २८ किमी अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले भू-बंदर आहे आणि पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव भू-मार्ग आहे. हे बंदर १२० एकरमध्ये पसरलेले आहे आणि ते थेट राष्ट्रीय महामार्ग-१ शी जोडलेले आहे. अटारी चेकपोस्ट केवळ भारत-पाकिस्तान व्यापारातच नाही तर अफगाणिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीतही महत्त्वाची भूमिका बजावते. अटारी-वाघा कॉरिडॉरमध्ये दरवर्षी व्यापार आणि प्रवाशांच्या वाहतुकीत चढ-उतार दिसून येतात. २०२३-२४ मध्ये या बंदरातून ६,८७१ मालवाहू वाहने गेली आणि ७१,५६३ लोकांनी या मार्गाने प्रवास केला. या कालावधीत एकूण ३,८८६.५३ कोटी रुपयांचा व्यापार झाला.
हे बंदर भारत आणि पाकिस्तानमधील एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. भारतातून सोयाबीन, चिकन फीड, भाज्या, लाल मिरच्या, प्लास्टिकचे दाणे आणि प्लास्टिकचा धागा यासारख्या वस्तू येथून पाठवल्या जातात. त्याच वेळी, पाकिस्तान आणि इतर देशांमधून सुकामेवा, सुका खजूर, जिप्सम, सिमेंट, काच, खडी मीठ आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती भारतात येतात. आता हे बंदर बंद झाल्यामुळे या गोष्टींच्या व्यापारावर परिणाम होईल, विशेषतः त्या लहान व्यापारी आणि कंपन्यांवर जे या सीमापार व्यापारावर अवलंबून आहेत.
त्याचा काय परिणाम होईल माहित आहे का ?
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, आधीच कमकुवत झालेल्या व्यापारी संबंधांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. अटारी चेकपोस्ट बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम विशेषतः दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या लहान व्यापारी आणि उद्योगांवर होईल.
याशिवाय, भारत आणि अफगाणिस्तानमधील आयात-निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो कारण यातील अनेक वस्तू पाकिस्तानमार्गे येतात आणि जातात. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे, माल पोहोचवण्यात अनेक अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे लॉजिस्टिक्स म्हणजेच मालवाहतुकीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
