शुभमच्या बायकोला पाहून CM योगी पण हळहळले…
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या भ्याड हल्ल्यात दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली. यात कानपूरच्या शुभम द्विवेदीचा देखील समावेश होता.
दहशतवाद्यांनी शुभम द्विवेदीला पत्नी ऐशान्यासमोरच गोळ्या झाडल्या. शुभमचे पार्थिव कानपूरला पोहोचताच शहरात शोकाकूल वातावरण पसरलं. शुभमची पत्नी, आई आणि इतर कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयत. शुभमवर आता शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः कानपूर गाठून शुभमच्या कुटुंबीयांची भेट घेतली. योगींना पाहताच ऐशान्या धाय मोकलून रडू लागली. ती म्हणाली की ‘दहशतवाद्यांनी माझ्या डोळ्यासमोरच माझ्या पतीवर गोळ्या झाडल्या. योगीजी आम्हाला बदला हवा आहे. तुम्ही याचा बदला घ्या’. इतकं बोलून ती रडू लागली. यावेळी योगी आदित्यनाथही भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
शुभमच्या अंत्यसंस्काराच्या आधी त्याची पत्नी ऐशान्या आपल्या पतीच्या पार्थिवाशेजारी बसलेली दिसली. आपल्या पतीची आपल्याच डोळ्यासमोर अशाप्रकारे हत्या झालेली पाहिल्यानंतर ऐशान्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ती गेल्या दोन दिवसांपासून आपल्या पतीचं आवडतं शर्ट अंगात घालून बसली होती. शर्टाला पकडून तिने घट्ट मिठी मारली आणि मग तिने एकच टाहो फोडला, तिला पाहून उपस्थित असणाऱ्या साऱ्यांचा अश्रूचा बांध फुटला. ती पतीच्या पार्थिवाजवळ बसून एकटक त्याच्याकडे बघत होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे. निरपराध पर्यटकांना त्यांची जात, धर्म विचारून मारण्यात आले. डोळ्यादेखत त्यांचं कुंकू पुसलं गेलं. कोणताही सुसंस्कृत समाज हे मान्य करणार नाही. हे भारतात अजिबात स्वीकारलं जाणार नाही. दहशतवाद्यांच्या शवपेटीत शेवटचा खिळा ठोकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीसीएसच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दहशतवाद आणि अतिरेकी संपवण्यासाठी संपूर्ण देश नव्या रणनीतीसह पुढे सरसावला आहे. मी शुभमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेतली आहे.
