रेवंत रेड्डींचं विधान;पंतप्रधान मोदींना दिलं इंदिरा गांधींचं उदाहरण !
दरम्यान, यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी काही मोठे निर्णय घेत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतातील विविध शहरात निषेध केला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील शुक्रवारी हैदराबादमध्ये निषेधार्थ मेणबत्ती मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी खासदार असदुद्दीन ओवैसी आणि इतर काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या भाषणाची मोठी चर्चा रंगली आहे. ‘पाकिस्तानचे दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा’, असं आवाहन रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांना इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी काय म्हणाले?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलताना रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचं आवाहन केलं. रेवंत रेड्डी यांनी म्हटलं की, “आपण सर्वजण मिळून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊ. जेव्हा आपल्या देशावर १९७१ मध्ये हल्ला झाला होता. तेव्हा इंदिरा गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आज आपल्याला पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. १४० कोटी भारतीय तुमच्याबरोबर आहेत. पाकिस्तानचे दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत”, असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.
भारताने पाकिस्तान विरोधात कोणते मोठे निर्णय घेतले?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहणार, संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ बंद, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा परवानगी रद्द, यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील, भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा, असे निर्णय भारत सरकारने घेतलेले आहेत.
दरम्यान, पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर ही युद्धाची कृती असल्याचं पाकिस्तानने म्हटलं.
