बिले थकीत नाही; कंत्राटदारांच्या जिल्हा परिषदेत रांगा…
सांगली येथील जलजीवन कामांचे कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या गंभीर वळणावर पोहोचली आहे. राज्यभरातील कंत्राटदारांनी या विषयावर आता निर्वाणीचा इशारा दिला आहे.
या विषयावरून आता राज्य सरकार विरुद्ध बांधकाम व्यवसायिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली येथील जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बिले थकल्याने आत्महत्या केली. यासंदर्भात राज्यभर खळबळ उडाली आहे. या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थकबाकीचा मुद्दा फेटाळला होता. मात्र प्रत्यक्षात हर्षल पाटील बिले मिळत नसल्याने संकटात सापडले होते. त्याला हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे तोंडघशी पडले आहेत.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बिले थकीत नाहीत, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर प्रतिक्रीया म्हणून अनेक कंत्राटदारांनी काल थेट नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बिले मागण्यासाठी रांगा लावल्या. कंत्राटदारांची मोठी गर्दी नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात झाली होती. त्यामुळे मंत्री पाटील अडचणीत आले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात चुकीची माहिती दिली, असे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात जलजीवन मिशनच्या कामाची प्रदीर्घकाळ बिले थकल्याने कंत्राटदार नैराश्यात गेले आहेत. खुद्द जळगाव जिल्ह्यामध्ये २५० कोटी रुपये तर नाशिक जिल्ह्यात ५५० कोटी रुपये जलजीवन मिशनच्या कामांची थकली आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला आहे.
हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटली आहे. नाशिकच्या कंत्राटदारांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेच्या आवारात एकत्र जमत हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहिली. प्रश्नावर आता आक्रमक होण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नाशिक जिल्हा कंत्राटदार संघटनेचे नेते मनोज खांडेकर आणि पदाधिकारी रमेश शिरसाठ, संदीप दरगोडे, बी. टी. सांगळे, शिवाजी घुगे, श्री पुकळे या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन केले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटण्याचे चिन्ह आहेत. थकबाकी मिळावी यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे अनेकदा प्रयत्न केले आहे. राज्य शासन यावर चुकीची माहिती देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शासनाचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे प्रतीक म्हणून कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येकडे पहावे, असे यावेळी सांगण्यात आले. राज्य शासन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा विचार करता या गंभीर प्रश्नावर ते काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
