संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त पदासाठी मंगळवारी (ता. 9 सप्टेंबर) निवडणूक होणार आहे. पण, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी फक्त काही तास शिल्लक राहिले असतानाच आता के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (बीजेडी) या दोन तटस्थ पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे.
हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर एनडीए किंवा इंडि आघाडीचा भाग नाहीत. सध्या बीआरएसचे 4 आणि बीजेडीचे 7 राज्यसभेचे खासदार आहेत. दोन्ही पक्षाचा लोकसभेत एकही खासदार नाही.
बीजेडी आणि बीआरएस या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, ते एनडीए आणि इंडि आघाडीपासून स्वतःला लांब ठेवणार आहेत आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानात भाग घेणार नाहीत. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांनी सोमवारी सांगितले की, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय हा राज्यातील युरियाच्या कमतरतेबद्दल तेलंगणातील शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त करतो. तर, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष युरियाच्या कमतरतेचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही बीआरएसने केला आहे. युरियाचा तुटवडा इतका गंभीर आहे की, रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भांडणे होतात, असेही बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांनी म्हटले आहे. पण जर उपराष्ट्रपती निवडणुकीत NOTA चा पर्याय उपलब्ध असता तर BRS ने त्याचा वापर केला असता, असेही यावेळी रामाराव यांनी सांगितले.
बीजेडीचे नेता सस्मित पात्रा यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती देताना सांगितले की, त्यांच्या पक्षाची प्राथमिकता ओडिशाच्या साडेचार कोटी जनता आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेते, राजकीय व्यवहार समिती आणि खासदारांशी केलेल्या चर्चेनंतर, बिजू जनता दलने उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिजू जनता दल हा एनडीए आणि इंडि आघाडी या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखत आहे. आमचे लक्ष ओडिशा आणि ओडिशाच्या साडेचार कोटी जनतेच्या विकासावर आणि कल्याणावर आहे, असे पात्रा यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत एकूण 11 राज्यसभेच्या खासदारांची मते कमी होणार आहेत.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 5 वाजता संपेल. इंडि आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांनी बनलेल्या निवडणूक मंडळाद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवडणूक संविधानाच्या कलम 64 आणि 68 च्या तरतुदींनुसार केली जाते. 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले.
