शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ…
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील आरोपी-प्रत्यारोप सुरूच आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरून केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाकरे गटाचे जवळपास सर्वच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे.
कृपाल तुमाने यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “संजय राऊत यांना सकाळी भोंग्यासारखं बोलायची सवय लागली आहे. काहीही बोलायचे म्हणून ते बोलतात. दसरा मेळाव्यात ते काय धमाका करतील, आम्हीच त्यांना दसरा मेळाव्यानंतर धमाका देणार आहोत,असं कृपाल तुमाने म्हणाले.
कृपाल तुमाने यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का देणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, ठाकरे गटाच्या दोन आमदारांना वगळता, बाकीचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील 60 टक्के नगरसेवक आधीच शिंदे गटात
कृपाल तुमाने यांनी पुढे म्हटले की, “मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे 60 टक्के नगरसेवक आधीच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे आले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावर केलेल्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळाव्याला दोन्ही गट आपली ताकद दाखवणार आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
