
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटकरवाडी ता. पैठण येथे 78 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव येथील कीर्ती कलेक्शनचे संस्थापक गौरव जाजू उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर नाटकर यांनी भूषविले.
शाळेचे मुख्याध्यापक भागवत फुंदे यांनी प्रास्ताविकातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच लोकसहभाग याबाबत माहिती दिली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी संदीप नाटकर (सहाय्यक आरोग्य सेवक) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे गौरव जाजू यांनी गेल्या वर्षी शाळेला 20 झाडे तसेच विद्यार्थ्यांना 43 मोफत गणवेश सुमारे 17 ते 18 हजार रुपये किंमत भेट दिले होते. त्यांनी दिलेल्या झाडांचे संगोपन, शालेय परिसराची स्वच्छता व प्रगती पाहून शाळा व गावाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून या दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच अंगणवाडी सेविका सौ. राणी शिंदे व नंदकिशोर नाटकर यांनी शाळेतील उपक्रम, प्रगती आणि मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व याबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण अंधारे यांनी केले. कार्यक्रमाला कारभारी नाटकर, संतोष नाटकर, चांगदेव नाटकर, परशुराम नाटकर, बळीराम नाटकर, शा. व्य. स. उपाध्यक्ष सौ. रेणुका नाटकर, शालेय समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, महिला वर्ग, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक फुंदे यांनी मानले आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.