दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी साहित्य किचन सेट व सुरक्षा किट तसेच शिष्यवृत्ती वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. मात्र सदर वाटप जिल्ह्याच्या ठिकाणी, तसेच लातूर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हरंगुळ बुद्रुक एमआयडीसी परिसरातील गोडाऊन येथे होत असल्यामुळे बांधकाम कामगारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याठिकाणी हजारो नोंदणीकृत कामगार साहित्य मिळविण्यासाठी सकाळी पहाटेपासून रांगेत उभे राहत असून, अनेक वेळा १८-१८ तास थांबावे लागत आहे. काहींना तर रात्रभर महामार्गावर किंवा गोडाऊन परिसरात झोपावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. वाटप केंद्रावर नियोजनाचा अभाव असल्याने अपेक्षेपेक्षा कितीतरी पट कामगार उपस्थित होत आहेत, परिणामी प्रचंड गर्दी, गोंधळ आणि अनुचित घटना घडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून साहित्याचे वाटप रखडलेले असल्याने कामगारांचे हाल अधिकच वाढले आहेत. त्यामुळे आता गृहोपयोगी किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप जिल्हा किंवा तालुका ठिकाणी न करता थेट ग्रामपंचायत स्तरावर करावे, अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात अखिल भारतीय बांधकाम संघटना शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष चंद्रप्रकाश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष अमोल गायकवाड, राष्ट्रीय मजदूर संघ मराठवाडा विभाग अध्यक्ष एस.जी. शिंदे अतनूरकर, उबाठा शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख विकास पाटील, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, मेवापूरच्या सरपंच सौ. कोमल तुळशीदास पाटील, गुत्तीच्या सरपंच सौ. मीना यादव केंद्रे, चिंचोलीच्या सरपंच रेखा बिरादार, माजी सरपंच संतोष बट्टेवाड यांसह अनेक मान्यवरांनी आवाज उठविला आहे.
कामगारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री आकाश फुंडकर, प्रधान सचिव कुंदन मॅडम, उपसचिव कापडणीस, सचिव विवेक कुंभार, कामगार उपायुक्त तसेच सहाय्यक कामगार उपायुक्त मंगेश झोले (लातूर) यांना ई-मेलद्वारे मागणी सादर केली आहे.
याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास, सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालय, लातूर येथे येत्या २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा बांधकाम कामगारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.