
अर्धा पक्ष रिकामा केला!
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी मोठा डाव टाकत भाजपला खिंडार पाडले असून शहापूर तालुक्यातील खर्डी, शिरोळ, शेणवा, कोठारे, साकडबाव,किन्हवली जिल्हा परिषद गटातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ताकदीनिशी उभा राहत असून भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढल्याचे खासदार म्हात्रे यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा निश्चितच फडकेल, असा विश्वासही यावेळी खासदार खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने भाजपमधून हा पक्ष प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालेल्या इन्कमिंगमुळे शहापूर तालुक्यातील अर्धी भाजप रिकामी झाली असल्याची खिल्ली नेते उडवत आहेत.
भाजपचे उप तालुकाध्यक्ष जयवंत बोडके,भाजपा बिरवाडी गटाचे विभाग अध्यक्ष अनिस शेख, भाजप आदिवासी सेल खर्डी विभाग अध्यक्ष नाना निखडे,माजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ वाख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.