
टॅरिफ आणि H-1B व्हिसा विवादादरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान !
भारतावर लावलेला अतिरिक्त टॅरिफ असो किंवा H-1B व्हिसाच्या फीमध्ये अचानक डोंगराएवढी केलेली वाढ, अमेरिकेतील प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतातील वातावरण सतत ढवळतं असून दोन्ही देशांत तणाव असतानाच भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान नुकतीच भेट झाली.
एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची सोमवारी भेट घेतली. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील ही भेट महत्वाची मानली जात
आहे. नव्या H-1B व्हिसाच्या शुल्कात वाञ करत ती फी तब्बल 1 लाख डॉलर्स ( सुमारे 88 लाख रुपये) करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयानंतर अवघ्या काही दिवसांतच भारत व अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली, त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते.
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळी रुबियो-जयशंकर यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केले, वाढता आर्थिक फरक असूनही त्यांच्या संबंधांमध्ये सातत्य राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. याच भेटीदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, मार्को रुबियोयांनी भारताबद्दल केलेल्या विधानाने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले मार्को रुबियो ?
या बैठकीदरम्यानचे काही तपशील समोर आले आहेत. ‘भारतासोबतचे संबंध हे अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचे आहेत.’ असे मार्को रुबियो म्हणाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नमूद केले आहे. रुबियो यांनी व्यापार कराराचे संकेत दिले आणि भारताचे कौतुक केले, व्यापार, संरक्षण, ऊर्जा, औषधनिर्माण आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रातील भागीदारीची प्रशंसाही केली. तसेच, त्यांनी इंडो-पॅसिफिक आणि क्वाड भागीदारीत एकत्र काम करण्यावर भर दिला.
एकीकडे रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी भारतावर दबाव टाकत टॅरिफ लादणं, तसेच H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करणं, असे उद्योग अमेरिका करत असून त्यामुळे भारतासोबतच्या संबंधावर परिणाम होताना दिसत आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतल्यावर भारताचसोबतचे संबंध अमेरिकेसाठी महत्वाचे असल्याचे विधआन करत , अमेरिका ही भारताला चुचकारण्याचा, समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे का, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीही ही बैठक सकारात्मक झाल्याचे वर्णन केले. त्यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट केली होती. ‘आमच्या संभाषणात द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विस्तृत समावेश होता. प्राधान्य क्षेत्रांमध्ये प्रगतीसाठी सतत सहभागाचे महत्त्व यावर आम्ही सहमत झालो. आम्ही संपर्कात राहू.’ असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
व्हिसा शुल्कामुळे भारतीय बाजारात खळबळ
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक व्हिसा शुल्काची घोषणा केल्याने, या बैठकीवर खोलवर परिणाम झाला. भारत हा H-1B व्हिसाचा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. गेल्या वर्षी भारताला 71 टक्के व्हिसा मिळाले, तर चीनला 12 टक्क्यांपेक्षा कमी व्हिसा मिळाले. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, व्हिसा शुल्कात अचानक वाढ केल्याने भारतीय आयटी कंपन्यांचा खर्च झपाट्याने वाढू शकतो. जेव्हा दोन्ही देश आधीच व्यापार वादात अडकले असतानाच हा झटका बसला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने जुलै महिन्यात भारतावर 25 टक्के कर लादला. त्यामुळे दोन्ही देशात बराच काळ तणावाचं वातावरण होतं, मात्र सप्टेंबरमध्ये, दोन्ही बाजूंनी व्यापार करारावर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. या अडचणी असूनही, वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांनी राजनैतिक संपर्क कायम ठेवला आहे. रुबियो आणि जयशंकर यांची शेवटची भेट जुलैमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत झाली होती. अमेरिका आणि भारताचे संबंध कसे राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.