
राज्यातील मराठवाड्याला आणि विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना या जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढले आहे.
त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देण्यात आले आहे. कृषिमंत्री भरणे यांनी आज मंगळवारी (ता. 23 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती दिली. तसेच, सगळीकडे पंचनाम्याचे युद्धपातळीवर काम सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे भरणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विदर्भात सर्वात मोठी अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा कहर झाला आहे. राज्यात जवळजवळ 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठची, ओढ्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीनच वाहून गेली आहे. पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे. गावात पाणी शिरले आहे. घराची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
तसेच, राज्यातील अतिवृष्टी पाहता पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. शेवटी हे निसर्गाचे संकट आहे. आपल्या सर्वांना या संकटाला सामोरे जावेच लागेल. आपल्या सर्वांना धीर धरावा लागणार आहे. या संकटाच्या काळी, अडचणीच्यावेळी हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. पंचनामा करण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी झाले आहेत. तर काही ठिकाणी लागलीच सुरू होईल. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. त्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष तपासण्यात येतील. पण आता शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदत मिळाली पाहिजे म्हणून आता मदतीवर भर देत आहोत. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. त्यांच्या पाठीशी उभे राहणार. निकष असले तरी आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यापुढे जाऊन मदत करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेऊ आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर काही तरी तोडगा निघेल. चांगला निर्णय होईल असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.