
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यांनी अनेक प्रकरणं उचलून धरल्यामुळे अनेक मंत्री अडचणीत आल्याचं आणि त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता.
पण आता दमानिया यांचं पुढचं टार्गेट भाजपचा मोठा नेताच असणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड महिला नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता आहे.
आता अंजली दमानिया यांनी मंगळवारी (ता.23) ट्विट करत उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार असल्याचं या पोस्टमधून जाहीर केलं आहे.
आजपर्यंत अंजली दमानिया यांच्यावर विरोधकांकडून नेहमीच त्या भाजप नेत्यांना सॉफ्ट कॉर्नर देतात असा आरोप केला जात होता. पण आता त्यांनी मंत्री गडकरींनाच टार्गेट करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पण आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत गडकरींना एक्सपोज करणार असल्याची घोषणा केली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. हे ट्विट त्यांनी रविवारी पाच वाजता केलं होतं.
यावेळी अंधारेंनी आपल्या ट्विटमध्ये तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात या प्रश्नाचं उत्तर नाही आणि हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. असो, तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही. कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत..! असं ट्विटमध्ये अंधारेंनी म्हटलं होतं.
या त्यांच्या ट्विटला 48 तास पूर्ण होत नाही,तोच अंजली दमानिया यांनी उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पोल खोल करायला सुरुवात करणार असल्याचं ट्विट केल्यामुळे अंधारेंची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी आमसभा घेतली. या सभेत त्यांनी अधिकाऱ्याला चांगलंच झापलं. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्या आमसभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत डिवचलं होतं.
त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यात उडी घेत, अंजली दमानिया भाजपची बाजू घेण्याच्या, विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फेव्हर’ करण्याच्या छुप्यापद्धतीवर बोट ठेवून फटकारलं होतं. तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर, आम्हाला फार नवल वाटणार नाही. कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत..!,’ असा टोला सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना ट्विटरवर लगावला होता.
याला प्रत्युत्तर देताना अंजली दमानिया यांनी सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी @RRPSpeaks आणि @andharesushama ह्यांना विनंती करते की, एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.असं म्हटलं होतं.