
महिला नगरसेवकांच्या पतींवर संतापली IAS अधिकारी; भर बैठकीत सुनावलं !
ग्वाल्हेरमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत महिला नगरसेवकांच्या जागी त्यांच्या पतींनी हजेरी लावली होती. महिला नगरसेवकांऐवजी त्यांचे पती उपस्थित असल्याचे पाहून जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी नाराजी जाहीर केली.
इतकंच नाही तर त्यांनी नगरसेवक पतींना बैठकीतून काढून टाकलं आणि त्यांना प्रेक्षकांच्या गॅलरीत बसण्यास सांगितलं. ही घटना बालभवन येथे घडली, जिथे शहराच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वच्छता, रस्ते आणि इतर समस्यांवर चर्चा केली जाणार होती.
बैठकीसाठी नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु काही महिला नगरसेवकांच्या जागी त्यांचे पती हजेरी लावत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांच्या पतींना फटकारलं. महिला आता सक्षम झाल्या आहेत आणि त्यांना त्यांचे काम स्वतः करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा शब्दांत त्यांनी सर्वांना सुनावलं आणि आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी नगरसेवकांच्या पतींना त्यांच्या खुर्च्यांवरून उठवलं आणि प्रेक्षकांच्या गॅलरीत बसवलं.
या घटनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी रुचिका चौहान म्हणाल्या की, “ग्वाल्हेर महानगरपालिका ही राज्यातील प्रमुख महानगरपालिकांपैकी एक आहे. काही महिला आणि त्यांचे पती सकाळच्या सभेला उपस्थित होते. आम्हाला वाटतं की केलेली व्यवस्था विचारपूर्वक करण्यात आली आहे. महिलांनी ज्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात त्या भागात उपलब्ध असलेल्या वेळेत मिळालेल्या अभिप्रायावर कृती करणे महत्वाचे आहे. महिलांनी बैठकांमध्ये स्वतःला व्यक्त करावे; यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. हे महत्वाचे आहे कारण, महिलांना आरक्षण देणाऱ्या विधेयकांनुसार, त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि त्यात योगदान दिले पाहिजे.