
मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाली आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे या देखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या नुकसान झालेल्या भागांना भेट देतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब परिसरात झालेल्या अतिवृष्टीची सध्या ते पाहणी करत आहेत. अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथेही दाखल झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तसेच अजित पवार हे परंडा तालुक्यातील देवगाव, भूम तालुक्यातील वालवड आणि वाशी तालुक्यातील पारगाव येथे पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
यावेळी सोलापुराच्या करमाळा तालुक्यातील कोरटी गाव अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. निधीची कोणतीही चिंता नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल आणि मदत देताना ६५ मिमी पावसाची अट ठेवणार नाही., असे विधान अजित पवारांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व आम्ही करू. आधी आम्ही पाहणी करत आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
पंकजा मुंडेही शेतकऱ्यांच्या बांधावर
तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आज परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट देणार आहेत. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे या गावाला मोठा वेढा बसला होता. पुराच्या भीतीने गावातील सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक मध्यरात्रीच शेजारच्या लोणी गावात स्थलांतरित झाले होते. पंकजा मुंडे यांनी गावातील परिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नुकसानीची सविस्तर माहिती घेणार आहेत.