
शेतकऱ्यांच्या मदतीवरून राऊतांनी सरकारला घेरले…
गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांमधील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला.
त्यामुळे हजारो हेक्टरी शेती वाहून गेली आहे. असे असतानाच आता राज्य सरकारमधील काही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करू लागले आहेत. सरकारने मराठवाड्यातील नुकसनाग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण सरकारमधील लोकांनी स्वतःच्या घरातील तिजोऱ्या रिकामी करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरले आहे. लोक मरतायत आणि तुम्ही भगव्या पिशव्या त्यावर तुमचे फोटो, पक्षाचे चिन्ह हे प्रचार करण्याचे कोणते तंत्र या लोकांनी अवलंबले आहे, असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 24 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या मदतीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सरकारला घेरत म्हटले की, 70 लाख एकरवर जमिनीवरची पिकं उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्याच घर, पशुधन नष्ट झालेले आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आता 36 लाख शेतकऱ्यांची पिकं, पशुधन, घरदार, गावच्या गावं वाहून गेलेली आहेत. 9 लाख कोटीच कर्ज असलेल्या या सरकारने 2215 कोटी रुपये कागदावर मंजूर केलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी केली. ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
कृषिमंत्री भरणेंना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी घेरले, वाचला नुकसानीचा पाढातसेच, मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता आपला सही, शिक्का, चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याच काम सुरू आहे. हा किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि तुम्ही भगव्या पिशव्या त्यावर तुमचे फोटो, पक्षाचे चिन्ह हे प्रचार करण्याचे कोणते तंत्र या लोकांनी अवलंबले आहे? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, भाजपाचा वेगळा कारभार, शिंदे गटाचा वेगळा काराभार, मग अजित पवार येतील. इथे सुद्धा स्पर्धा चाललीय का? लोक मरतायत, आक्रोश चालला आहे. लोक वाहून जातायत अशा प्रकरे निदर्यीपणे काम करणारं सरकार आहे, असा घणाघात राऊतांनी केला.
तर, प्रत्येक ठिकाणी राजकारणात पैशाची मस्ती आहे, एवढी पैशाची मस्ती असेल, तर स्वतःच्या घराच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. नगरविकास खात्याने ठेकेदाराकडून लुटलेला पैसा, शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा. अबालवृद्ध तरुण, महिलांना मदत करा. ही सरकारची जबाबदारी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. सरकारने कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. याआधी दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला त्या संदर्भात आश्वासन दिली पण का पूर्ण झाली नाहीत?. या सरकारवर 9 ते 10 लाख कोटीच कर्ज आहे. ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार?. म्हणून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे की, 10 हजार कोटींची तात्काळ मदत करा. ओला दुष्काळ शब्द सोडून द्या, हा आघात साधा नाही. फक्त पिकं वाहून गेलेली नाहीत, शेत जमीन, माती वाहून गेली आहे.
ज्या मातीत पिक घेतली जातत, ती मातीच वाहून गेलीय. पुढच्या अनेक पिढ्याचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या दृष्टीने उद्वस्त झाला आहे, हे या सरकारच्या लक्षात आलय का?. जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत त्यांना किती मोठं नुकसान झालय हे कळलय का?. ही मतं मागण्याची, प्रचार करण्याची वेळ नाहीय, हे भाजपा आणि शिंदे गटाला समजले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला घेरले.