
टोलमधून मिळालेला पैसा IDL कंपनीमार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला; अंजली दमानियांचा गंभीर आरोप…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
दमानिया यांनी गडकरी यांच्यावर जनतेवर टोल थोपवल्याचा आरोप केला. दमानिया यांच्या मते, नितीन गडकरी यांनी जनतेवर टोल थोपवला आहे. नागरिक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जात आहे? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली. टोलमधून मिळालेला पैसा ‘आयडीएल’ नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे.
प्रत्येक किलोमीटरमागे भ्रष्टाचार, गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या
दमानिया म्हणाल्या की, ज्यांना ‘एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया’ म्हटले जाते, ते प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खात आहेत. दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) आणि टोल-ऑपरेट-ट्रान्सफर (TOT) या मॉडेल्सवर टीका केली आहे. गडकरी यांच्यावर इथेनॉल संदर्भातही दमानिया यांनी केले आहेत. इथेनॉल संदर्भात दमानिया यांनी गडकरींच्या कंपन्यांच्या जाळ्यावर बोट ठेवले आहे. दमानिया यांनी दावा केला आहे की, इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. त्या म्हणाल्या की, मोठ्या घोटाळ्याचा संशय असून त्यांच्याकडे अशा 128 कंपन्यांचे तपशील आहेत आणि या कंपन्यांची माहिती उघड केल्यास वर्षभर पुरेल, असे त्या म्हणाल्या. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमागे त्यांच्या कंपन्या कशा येतात, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पदाचा उपयोग मुलांच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केला
दमानिया यांनी निखिल नितीन गडकरी यांचे नाव थेट घेतलेले नाही, परंतु दोन्ही मुलांच्या कंपन्या असा उल्लेख केला. टोलमधून मिळालेला पैसा आयडीएल कंपनीमार्फत थेट गडकरींच्या मुलांसाठी बनवलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. त्या म्हणाल्या की, नितीन गडकरी मंत्री म्हणून देशसेवा करण्यासाठी आले होते, स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या उघडण्यासाठी नाही. त्यांनी आपल्या पदाचा उपयोग मुलांच्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी केला, असा आरोप केला.