
दोन-तीन वेळा शपथविधी; या माजी मंत्र्याने सगळंच काढलं !
मराठवाडा विदर्भातील पुरस्थितीनंतर शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याऐवजी अर्थमंत्री अजित पवार यांनी पैशाचे सोंग करता येत नाही असे म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणींमुळे सरकार अडचणीत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
यावरुन आता विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांनी अजित पवार यांची दादागिरी फक्त सत्तेत राहण्यापूरतीच आहे, असा टोला लगावत गोट्या खेळूनच त्यांनी दोन-दोन वेळा शपथ घेतली अशी बोचरी टीका केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान केले आहे. शेतजमीनी खरवडून गेल्या, उभं पिक आडवं झालं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. अशा काळात शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि कर्जमाफीची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. यावर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी काही गोट्या खेळत नाही, राज्यासाठी काय करायचे ते मला कळतं. लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोटी देत आहोत. पैशांचे सोंग आणता येत नाही, असे उत्तर अजित पवार यांनी माध्यमांना दिले होते.
नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. अनावश्यक प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आता मदतीची गरज असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, “गोट्या खेळून दोन-तीन वेळा शपथविधी घेतली. त्यांना गोट्या खेळायचं चांगलं समजतं. गोट्या खेळूनच सरकार चालवायला लागले आहेत. आता म्हणतात पैसे नाही, लाडक्या बहिणींना कशाला बदनाम करता,” असा सवालही त्यांनी केला.
महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठाचा उल्लेख करुन बच्चू कडू म्हणाले की, शक्तीपीठ कोणी मागितला होता, त्याची सध्या काही गरज आहे का, हा प्रकल्प तीन वर्ष तसाच राहुद्या. कोणाची मागणी नाही, कोणी मागितला नाही, तरी तुम्ही कशाला करत आहात, असा सवाल त्यांनी केला. असे अनेक प्रकल्प आहेत. मुंबईत स्मार्ट सिटीत पैसा गुंतवला आहे. पुणे, नागपूर, संभाजीनगरमध्ये दोन ते तीन लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. शेतकऱ्यांना कुठे काय दिले आहे? आणि जेव्हा ग्रामीण भागातील माणूस, शेतकरी अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही म्हणता, असा टोला त्यांनी लगावला.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल, हेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, डीपीडीसीचे 200-200 कोटी कमी करा. सर्व क्लासवन आणि क्लास टू अधिकाऱ्याचे पगार कपात करा. आमदारांचे पगार कपात करा, यातून एक लाख कोटीची बचत होऊ शकते. शेतकऱ्यांना देण्यासाठी फक्त मानसिकता लागते. असे म्हणत माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, केंद्रात देखली तुमच्याच विचारांचे सरकार आहे.
पंजाबमध्येही अतिवृष्टी झाली. तिथले राज्यकर्ते ज्या पद्धतीने समोर आले तसं तुम्हाला समोर यायला का जमत नाही, असा सवाल त्यांनी केला.
दादांची दादागिरी फक्त सत्तेत राहण्यासाठी शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी ते दादागिरी कधी दाखवणार, याची आम्ही वाट पाहात आहोत, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
माजी आमदार बच्चू कडू म्हणाले की, विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांचा पगार जमा केला तर 90 कोटी रुपये जमा होतील. राज्यात जर दुष्काळ असेल तर त्या दुष्काळाची झळ फक्त शेतकरी आणि शेतमजुरांनाच का, असा सवाल करत ते म्हणाले की, चांगलं झालं तर सगळ्यांच चांगलं होतं, मग दुष्काळाच्या झळाही सगळ्यांना बसू द्या.