
सांगलीच्या विराट सभेनंतर जयंत पाटलांवर पृथ्वीराज पवार तुटून पडले !
गोपीचंद पडळकर यांनी अश्लाघ्य भाषेत जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेनंतर सांगलीमध्ये मोर्चा काढत विरोधी पक्षातील नेत्यांनी पडळकरांवर टीका केली. पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन आम्ही करत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
या वादात भाजपचा कोणताही नेता पडळकरांच्या बाजुने दिसला नाही. मात्र, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार हे जयंत पाटलांवर तुटून पडले आहेत.
लोकनेते राजारामबापू पाटील हे नायक होते, मात्र जयंत पाटील खलनायकच आहेत. राज्यातील नेते सांगलीत जमवून त्यांनी आपला खोटा सोज्वळ चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणू. त्यांच्या कुकर्माची कुंडली जनतेसमोर मांडून त्यांनी सहानुभुतीसाठी भरवलेला बाजार उठवू, असा इशारा पवार यांन दिला.
पवार म्हणाले, ‘सांगलीच्या राजकारणात ज्यांनी विकृतीचा कळस गाठला, त्या माणसाचे नाव घेऊन महाराष्ट्र संस्कृतीचा ढोल वाजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. त्यांना सोज्वळ, संयमी, शांत, सुस्वभावी राजकारणी दाखवण्याचा तो इव्हेंट होता. परंतू, त्यांची काळी बाजू सगळ्या सांगलीला माहिती आहे. ती महाराष्ट्राला कळली पाहिजे. त्यांचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे. या माणसानं सांगलीकरांच्या पाठीत, राजारामबापूंच्या विचारांच्या पाठीत, बापूंवर प्रेम करणाऱ्या माणसांच्या पाठीत कसा खंजीर खुपसला, याचा पंचनामा आम्ही करू.
जतचा डफळे साखर कारखाना नियोजनपूर्वक बंद पाडून तो स्वस्तात कसा गिळला, याचा हिशेब मांडू. राजारामबापूंच्या विचारांचे पाईक राहिलेल्या स्व. नानासाहेब सगरे, स्व. विजयराव सगरे यांचा महांकाली कारखाना बंद पाडून हडपण्याचा डाव कसा रचला गेला, जिल्हा बँकेच्या अमर्याद सत्तेचा गैरवापर कसा केला गेला, याची कुंडली लोकांसमोर ठेवू. जयंत पाटील धोका देत असल्याने खचलेले विजयराव सगरे यांना मी पाहिले आहेत, असा दावा देखील त्यांनी केला.