
बाहेरच्या देशाने कुठलाही…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कातंत्र अजूनही चालू असून आता त्यांनी आयात केल्या जाणाऱ्या ब्रँडेड औषधांवर १०० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लादण्याची नवी घोषणा केली आहे.
औषधांबरोबरच अवजड ट्रकवर २५ टक्के आणि स्वयंपाकघरातील कॅबिनेटवर ५० टक्के टॅरिफ लादणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलं आहे. मात्र, औषध उद्योगाला त्यातून वगळलं होतं. मात्र, आता औषध उद्योगालाही त्यांनी दणका दिला आहे.
अमेरिका भारतातून मोठ्या प्रमाणात औषधं आयात करते. त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे. भारताच्या औषध निर्मितीत महाराष्ट्राचाही मोठा वाटा असल्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांकडून मोदींच्या स्वदेशीच्या नाऱ्याचं समर्थन
अजित पवार म्हणाले, “अमेरिकेच्या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना चार वर्षांसाठी निवडून दिलं आहे. ते त्यांच्या देशासाठी निर्णय घेत आहेत. त्यांनी असे कितीही निर्णय घेतले तरी आपण त्याला समर्पक उत्तर देऊ. महात्मा गांधींनी देशाला स्वदेशीचा नारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पुन्हा एकदा तीच घोषणा केली आहे. आपण आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू खरेदी करून इतरांना उत्तर देऊ शकतो.”
“आपण आपल्या राज्यापुरते निर्णय घेऊ शकतो. ट्रम्प यांनी असं केलं, आमक्याने तसं केलं, तमक्याने असं केलं असं बोलून चालणार नाही. तो त्यांचा देश आहे, त्यांच्या देशात काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी अमेरिकेच्या जनतेने त्यांना चार वर्षांसाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे अमेरिकेबाबत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. बाहेरच्या देशाने कुठलाही निर्णय घेतला तरी त्याला समर्पक उत्तर देणं गरजेचं आहे. आपण आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू वापरून उत्तर देऊ, तेच आपलं काम आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले, महात्मा गांधी यांनी स्वदेशी नारा दिला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तीच घोषणा केली आहे. आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. देश स्वतंत्र होऊन ७५ हून अधिक वर्षे झाली आहेत. आता आपल्याकडे खूप गोष्टी आहेत. आपण कोणावर अवलंबून नाही.