
राज्यातील पूरस्थितीबाबत केली ‘ही’ मागणी !
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी फडणवीसांनी मोदींशी चर्चा केली.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांना मी एक निवेदन दिले आहे. त्यांना एकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना आम्ही दिली. कशा पद्धतीचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सांगितलं. त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करा. त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनी सांगितले की लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की त्यावर कारवाई करू. शक्य तेवढ्या जास्त मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही प्रकल्पाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादरीकरण केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, याव्यतिरिक्त महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात देखील मी प्रझेंटेशन मी केले आहे. ज्याच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं की, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होत आहे. ज्यामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होऊन रोजगार निर्मिती होईल. तीन ठिकाणी हा कॉरिडॉर करता येईल हे आपण दाखवलं आहे.
याचा पहिला भाग पुणे, अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगर येथे आपण करू शकू, दुसरा भाग नाशिक, धुळे वगैरे या भागात आणि तिसरा भाग नागपूर, वर्धा आणि अमरावती या भागात करू शकू, याचा रोडमॅप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले. यावर देखील पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.