
घेणार मोठा निर्णय…
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका, त्यांना स्वंतत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मोठा लढा उभारला आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून मिळणाऱ्या आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे.
यावरून अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे आमने-सामने आल्याचं देखील पहायला मिळालं. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली. मात्र आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्याबद्दल त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.
नेमकं काय म्हटलं हाके यांनी?
‘मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो – लक्ष्मण हाके’ असं हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.