
भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र !
आजच्या काळात जग ऊर्जेच्या नवीन स्त्रोतांचा शोध घेत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सारख्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे ही प्रत्येक प्रगत राष्ट्राची प्राथमिकता झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लहान अणुभट्ट्या म्हणजेच Small Modular Reactors (SMRs) या तंत्रज्ञानाने ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवली आहे. सध्या जगातील अनेक शक्तिशाली देश SMR तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. चीनने १०० मेगावॅटचा जमिनीवर आधारित SMR उभारला आहे, रशियाही या क्षेत्रात पुढे चालला आहे, आणि भारताने स्वतःचा ‘भारत SMR’ बांधण्याची गती वाढवली आहे.
SMR म्हणजे काय?
SMR हे पारंपारिक अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत आकाराने लहान, कमी जागा घेणारे आणि सहज वाहतूक करता येणारे रिअॅक्टर असतात. साधारणतः हे ३०० मेगावॅटपेक्षा कमी वीज निर्माण करतात. पारंपारिक मोठ्या अणुभट्ट्यांना शेकडो हेक्टर जागा लागते, पण रशियन SMR फक्त १५-१७ हेक्टरमध्ये उभारता येतो. डॉ. अलेक्झांडर व्होल्गिन, प्रकल्प संचालक (दक्षिण आशिया, Rosatom) यांच्या मते “SMR हे एक पूर्ण पॅकेज आहे. यात पंप, स्टीम जनरेटर आणि अणुइंधन एकाच युनिटमध्ये असते. इतके कॉम्पॅक्ट की रेल्वेने सुद्धा वाहून नेता येते.” यामुळे औद्योगिक क्षेत्रे, दुर्गम भाग, बेटे किंवा जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या ठिकाणी सहजपणे SMR बसवून वीज निर्मिती करता येते.
भारताची ऊर्जा क्रांती
भारत सध्या नेट-झिरो २०७० ध्येयासाठी वेगाने प्रयत्नशील आहे. यासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य जाहीर केले आहे. मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) सध्या ‘भारत SMR’ विकसित करत आहे. या प्रकल्पामुळे भारताची जीवाश्म इंधनांवरील परावलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल. सौदी अरेबिया सारख्या देशांकडून पेट्रोल-डिझेलसाठी खर्च होणारे अब्जावधी डॉलर्सही वाचतील.
रशियाची भारताला मदतीची ऑफर
रशियाचे अणु महामंडळ Rosatom भारतासोबत SMR क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार आहे. डॉ. व्होल्गिन यांनी स्पष्ट केले “जर भारतीय अणुऊर्जा विभागाने आम्हाला आमंत्रित केले, तर आम्ही निश्चितच सहकार्य करू.” रशिया भारतात स्थानिक पातळीवर SMR पुरवठा साखळी विकसित करण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे बांधकाम आणि तैनाती अधिक वेगवान होईल.
खाजगी कंपन्यांची एन्ट्री
NPCIL आणि NTPC यांच्यात अलीकडे झालेल्या संयुक्त उपक्रम करारामुळे आता खाजगी क्षेत्रातही अणुऊर्जेचा प्रवेश होत आहे. यामुळे SMR सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब जलदगतीने होऊ शकेल. तज्ञांच्या मते, SMR हे पारंपारिक मोठ्या प्रकल्पांपेक्षा खूपच स्वस्त, कॉम्पॅक्ट आणि जलद उभारता येणारे आहेत. त्यामुळे ते एआय आधारित डेटा सेंटर्स, दुर्गम औद्योगिक क्षेत्रे आणि बेटांवर विशेषतः उपयुक्त ठरणार आहेत. आज जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) उद्योगाची क्रांती घडवत आहेत, तेव्हा त्यांना प्रचंड प्रमाणात स्वच्छ, विश्वासार्ह आणि सततची ऊर्जा लागते. अशा वेळी SMR हेच भविष्याचे ऊर्जा समाधान ठरत आहे. भारताने जर या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवले, तर ते केवळ ऊर्जेच्या स्वावलंबनासाठी नाही, तर जागतिक पातळीवर भू-राजकीय ताकद वाढवण्यासाठीही निर्णायक ठरेल.