
भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला !
टीम इंडियाने जोरदार खेळी करत पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने आशिया कप २०२५च्यावर नाव कोरलं. आशिया कप २०२५ची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचं अभिनंदन केलं जात आहे.
आशिया कप २०२५च्या फायनलनंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्वीट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पण, हे ट्वीट करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरला टोला लगावला आहे.
अमिताभ बच्चन यांचं ट्वीट
जिंकलो!! अभिषेक बच्चन चांगला खेळलास. तिकडे त्यांची बोबडी वळली. आणि इकडे तू बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग काहीच न करता दुश्मनची बोलती बदं केली. जय हिन्द ! जय भारत ! जय माँ दुर्गा !!!!”, असं त्यानी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाला होता शोएब अख्तर?
शोएब अख्तरने सामन्याच्या आधी एका लाइव्ह शोमध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माच्या नावाऐवजी चुकून अभिषेक बच्चनचा उल्लेख केला होता. “जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर आऊट केलं, तर त्यांच्या मधल्या फळीचं काय होईल? त्यांचे मधले बॅट्समन चांगले खेळलेले नाहीत”, असं त्याने म्हटलं होतं. लक्षात येताच शोएबने आपली चूक सुधारली होती. मात्र यावरुन त्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं होतं. अभिषेक बच्चननेही याचा रिप्लाय दिला होता. “सर, मी तुमचा आदर करतो… पण मला नाही वाटत की त्यांना तेही जमेल! आणि मी तर क्रिकेट खेळण्यात अजिबात चांगला नाहीये.”, असं मजेशीर उत्तर अभिषेक बच्चनने दिलं होतं.
दरम्यान, आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध निषेध नोंदवला. टीम इंडियाने त्यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हे नाट्य सुमारे २ तास चालले. त्यानंतर मोहसिन नक्वी निघून गेले आणि ट्रॉफीही कोणीतरी घेऊन गेले.