
आता ‘या’ उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली आहे.
त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवरुन याची घोषणा केली. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतात, “एखाद्या बाळाच्या हातून चॉकलेट चोरल्याप्रमाणे आपला चित्रपट निर्मिती व्यवसाय इतर देशांनी चोरुन नेला आहे. त्यामुळेच मी आता अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ (कर) लावणार आहे. MAKE AMERICA GREAT AGAIN!”, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.
भारतीय चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा व्यवसाय जवळपास 20 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. परंतु नव्या टॅरिफमुळे या उत्पन्नात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीपूर्वी अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा बाजार सुमारे 8 मिलियन डॉलर्स एवढाच होता. त्यानंतर यात झपाट्याने वाढ झाली आणि तो 20 मिलियन डॉलर्सपर्यंत गेला.
भारतीय चित्रपटांची लोकप्रियता वाढली
गेल्या काही काळात अमेरिकेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. हिंदी चित्रपट असो वा दक्षिण भारतीय चित्रपट असो, अनेक चित्रपटांनी अमेरिकेत चांगली कमाई केली आहे. परंतु ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनंतर अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.