
BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम !
भारतानेपाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक 2025 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पण, विजयानंतर मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानेपाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे प्रमुख मोहसिन नकवींकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
त्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन निघून गेले. आता यामुळेच त्यांच्याविरोधात पोलिस कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
72 तासांनंतरही भारताला ट्रॉफी मिळाली नाही
आशिया चषकातील अंतिम सामन्याला 72 तासांहून अधिक काळ उलटूनही मोहसिन नकवींनी ट्रॉफी ना भारताला दिली, ना ACC च्या कार्यालयात सुपूर्द केली. उलट ती त्यांच्या हॉटेलच्या खोलीतच ठेवली असल्याचा आरोप आहे. मंगळवारी झालेल्या ACC च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी नकवीच्या कृतीचा विरोध केला, मात्र नकवी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ACC च्या कार्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जावी, अशी त्यांची अट आहे.
BCCI ची पोलिस तक्रारीची तयारी
न्यूज१८ च्या वृत्तानुसार, बीसीसीआय या प्रकारामुळे संतप्त असून त्यांनी दुबई पोलिसांकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नकवींना 72 तासांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ट्रॉफी न दिल्यास त्यांच्यावर ट्रॉफी चोरी आणि बेकायदेशीर ताब्याचा गुन्हा दाखल केला जाईल. अशा परिस्थितीत नकवींना अटकही होऊ शकते. नकवी ट्रॉफीसह दुबई सोडून पाकिस्तानला पळून जाऊ नयेत, यासाठी बीसीसीआयने यूएई प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
दुबईचे कठोर कायदे
दुबईमध्ये गुन्हेगारी दर कमी असला तरी कायदे अत्यंत कठोर आहेत. चोरी किंवा बेकायदेशीर ताबा यासाठी किमान 6 महिने ते 3 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. गंभीर प्रकरणांत शिक्षा 3 ते 15 वर्षांपर्यंत वाढू शकते. अगदी कंपनीतील कर्मचाऱ्यानेही नियोक्त्याची मालमत्ता चोरल्यास 5-7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यामुळे मोहसिन नकवींवर खटला दाखल झाल्यास त्यांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो.