
त्यांच्या तोंडात शेण…
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काल सडकून टीका केली. त्यांनी उद्धव यांच्याब्दल धक्कदायाक दावे करत काही आरोपही केले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? असा सवाल विचारत त्याचा तपास करावा अशी मागणी कदम यांनी केली. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ माजली असून राज्यभरात चर्चा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना या विषयावर प्रतिक्रिया देत कदम यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्यांच्या तोंडामध्ये शेण कोंबलं असेल, अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांशई बेईमानी आहे, असं म्हणत राऊतांनी कदमांना चांगलच फटकारलं.
ही तर बाळासाहेबांशी बेईमानी
(बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं) तेव्हा हे लोक नव्हते तिथे, मी होतो तिकडे. आम्ही तेव्हा मातोश्रीवर होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात, आम्ही शेवटपर्यंत तिथे होतो.आम्हाला माहीत आहे. आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते जर आता उगाळत असतील तर तुम्ही काय करणार ? शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं, त्यांचं आता जन्मशताब्दी वर्ष येईल. आणि आता अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला, आम्हाला मोठं केलं, अशी वक्तव्य करणं म्हणजे त्या बाळासाहेबांशी बेईमानी आहे अशा शब्दांत संजय राऊतांनी रामदास कदमांना सुनावलं.
काय म्हणाले होते रामदास कदम ?
काल शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी धक्कादायक विधानं केली. “शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे,” असे रामदास कदम त्यांच्या भाषणात काल म्हणाले. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता?. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.
” मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती,” असं धक्कादायक विधान रामदास कदम यांनी केल्यावर संपूर्ण राज्यात यावरून खळबळ माजली, चर्चा सुरू झाली.