
संजय राऊत म्हणाले; दोन्ही बाजूंनी…
२ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त दोन्ही शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा घेण्यात आला. नेहमीप्रमाणे एकमेकांवर टिका-टिप्पणी करण्यात आली. यात सर्वात चर्चेचा विषय ठरला राज ठाकरेंच्या अनुपस्थितीचा.
राज ठाकरे हे शिवसेनेच्या (ठाकरे) मेळाव्याला हजेरी लावतील, असे सांगितले जात होते. मात्र ते अनुपस्थित राहिल्यामुळे माध्यमात विविध चर्चांना पेव फुटले. यावर उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका व्यक्त केली असून आता संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “यंदाचा दसरा मेळावा अनेकदृष्टींनी महत्त्वाचा होता. मुंबईसह महाराष्ट्रात धो धो पाऊस पडत आहे. पाऊस पडून शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) चिखल आणि पाणी साचणार याची कल्पना असूनही शिवसेनाप्रमुख आणि आम्ही सर्वांनी आपली मेळाव्याची परंपरा सोडायची नाही, असे ठरवले. कालच्या मेळाव्याला पाऊस पडत असूनही हजारो शिवसैनिक उपस्थित होते. हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक दाखवणारे आहे.”
म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो
दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे का येऊ शकले नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले, “गेल्या काही काळात आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी एकमेकांविषयी प्रेम, मैत्री, नाते हे कायम ठेवले होते. म्हणून तर आम्ही इतक्या पटकन एकत्र येऊ शकलो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी जाहीर बोलू शकतात. म्हणूनच मी काल म्हणालो की, या शिवतीर्थापलीकडे एक शिवतीर्थ आहे. ज्याच्याशी आपले नाते घट्ट आहे.
राज ठाकरेंबाबत म्हणाले…
राज ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आले नाहीत, त्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. “आम्ही ५ जुलै रोजीच एकत्र आलो होतो”, असे ते म्हणाले. या विधानाचा धागा पकडत संजय राऊत म्हणाले, “दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी आहे. एवढेच मी सांगू शकतो.
एकनाथ शिंदेंना दिले प्रत्युत्तर
शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) टीका केली होती. कुणाचेही मनोमीलन झाले तरी काही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले होते. शिंदेंच्या या विधानाचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत.
शिवसेना आणि ठाकरेंमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, असे विधान शिंदे यांनी केल्याची आठवण करून देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. अशाप्रकारचे विधान कुणी केले असेल तर त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांची किंमत ५० ते १०० कोटी झाली. मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेले होते? लिहून दिलेल्या भाषणामुळे काहीही बोलायची सवय लागली आहे.