
राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपचा सर्वात मोठा धक्का; सांगलीतून मोठी बातमी…
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभेमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागम केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीच्या तब्बल 232 जागा निवडणून आल्या तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांना अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचं पहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सुद्ध महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत, काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर काही नेते हे भाजपच्या वाटेवर आहेत.
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगलीमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते येत्या सात ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.
गळती थांबवण्याचं आव्हान
दरम्यान विधानसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली गळती ही महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत असून, ही गळती थांबवण्याचं मोठं आव्हान या तीनही पक्षांसमोर आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.