अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या गळ्यातील बदलेला पंचा हा जिल्ह्यासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने थोरात यांनी संगमनेरची सगळी धुरा आमदार असलेले भाचे सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर दिल्याने झालेला हा बदल संगमनेर नगरपालिकेपुरताच सीमित असणार की राज्याभर त्याचे परिणाम भविष्यात दिसणार हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.
सुरूवातीची अपक्ष वगळता सलग सात वेळेस थोरात हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आमदार झाले. काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून त्यांची जिल्हाच नव्हे तर राज्यभर ओळख आहे. संगमनेरवर थोरातांचे एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. मात्र गत विधानसभेला त्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतरही थोरात हे काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे अनेकांनी पाहिले, अनुभवले. संगमनेर नगरपालिकेची सत्ता त्यांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांच्या हाती होती. दरम्यान सत्यजित तांबे हे विधानपरिषदेची निवडणूक लढवत आमदार झाले. संगमनेर नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्त्व थोरातांनी आ. तांबे यांच्याकडे सोपविले.
आ. तांबे यांनी नगरपालिकेची निवडणूक ’संगमनेर सेवा समिती’च्या बॅनरखाली लढविण्याचा निर्णय घेतल्याने नगरपालिकेच्या मतपत्रिकेत पंजा चिन्ह प्रथमच दिसणार नाही. नव्या चिन्हावर मतदारांना सामोरे जाण्याचा निर्णय आ. तांबे यांनी घेतला. इतकेच काय पंचाचा रंगही बदलण्याचा निर्णय घेतला. आ. तांबे यांनी घेतलेल्या बदलाचा परिणाम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यातील पंचा बदलण्यात झाल्याचे चित्र संगमनेरकरांनी अभुनवले. मात्र बदलेला पंचा हा संगमनेरपुरताच सीमित असेल की आगामी काळात राज्यातही त्याचा बदल होणार याची उत्सुकता राज्यालाही लागून आहे.
सेवा समिती उमेदवारांच्या प्रचारात
बाळासाहेब थोरातांनी संगमनेर नगरपालिका निवडणूक रिंगणात उभा ठाकलेल्या सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ करत मतदारांना सादही घातली आहे. आ. तांबे यांच्या भूमिकेशी माजी मंत्री थोरात हे सहमत असल्याचा संदेश यातून दिला गेल्याची चर्चा आहे.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्रीनिवडणूक संपली की विरोधक असा भेदभाव आपण कधी केला नाही. सर्वांना बरोबर घेत सुसंस्कृत राजकारणाची आदर्श परंपरा निर्माण केली. आगामी काळातही बंधुभाव, शांतता, सुव्यवस्था वाढीस लागली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. संगमनेरची परंपरा, संस्कृती जपायची असल्याने नागरिक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहे.


