संजय गायकवाडांची भाजप नेत्यावर टीका !
नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
आम्हाला भयमुक्त आणि नशामुक्त बुलढाणा करायचं आहे असं विजय शिंदे म्हणाले. तर सत्ता असताना तुम्ही मुंबईतील डान्सबारमधील महिलांशी अश्लील चाळे करत बसला, तुम्हाला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही असा टोला आमदार संजय गायकवाड यांनी लगावला.
बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्या पत्नी आणि शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी या आमने-सामने आहेत. त्यातून या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. त्यातून आता बुलढाण्यात आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघाल्याचं दिसतंय.
नशामुक्त बुलढाणा, भाजपचा नारा
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की, बुलढाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. बुलढाण्यातील जनतेला भयमुक्त, दहशतमुक्त आणि घराणेशाही मुक्त वातावरण हवं आहे. हे शहर शांत आणि संयमी लोकांचं आहे. या शहरामध्ये एखाद्या परिवारामध्ये सत्तेची किती भूक असावी? मुलगा, पत्नी, व्याही, पुतण्य़ा , भाचा हे नगरपालिकेत आणि जावई जिल्हा परिषदेवर अशी एकाच घरात किती सत्ता असावी? एकाच घरात एवढी सत्ता आल्यावर ते अराजकतेकडे जातात. त्यामुळे भयमुक्त, नशामुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शहर हा आमचा नारा आहे.
तुला नशा केल्याशिवाय जमत नाही…
विजय शिंदे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मी माझ्या परिवारातील तीन तिकिटं कापली आहेत. तुम्हाला तुमचं घर सांभाळतं आलं नाही, कार्यकर्त्याला मोठं करता आलं नाही. तुला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही आणि तू काय नशामुक्त बुलढाणा करणार?
पंधरा वर्षे सत्ता असताना यांनी जनतेची सेवा न करता मुंबईतील डान्सबारमधील महिलांशी अश्लील चाळे केले. जनतेची सेवा न करता अय्याशी केली असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. आमची सत्ता कशी असते हे लोकांनी पाहिलंय. कोरोना काळात आम्ही काम केलं. आमचा एक तरी भ्रष्टाचार दाखवा. गायकवाड कुटुंबाने जनसेवेचं व्रत घेतलं आहे, मरेपर्यंत आम्ही जनतेची सेवा करणार…


