हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत !
प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर साधारण दीड वर्षांनंतर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केलं जातं आहे.
आगामी कुंभमेळ्यात सुमारे ११५० एकर क्षेत्रावर अशाप्रकारचं साधूग्राम उभारण्याचं नियोजन करण्यात येत आहे. तपोवनमध्ये महापालिकेची जवळपास ५४ एकर जागा आहे. तेथील सुमारे १७०० विविध प्रजातींच्या वृक्षांची आणि पुनर्रोपण करण्याबाबत नोटीस देऊन महापालिकेनं हरकती व सूचना मागविल्या होत्या. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) त्याची मुदत संपुष्टात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचं लक्षात आल्यावर पर्यावरणप्रेमीच नव्हे तर, नागरिकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हास्यजत्रेचे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची पोस्टही चर्चेत आली आहे.
सचिन गोस्वामी यांनी काय म्हटलं आहे?
तपोवन वृक्षतोडीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा शोचे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरती एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “कुंभ मेळ्यातील साधू संताना तपोवनात राहूटी उभारून व्यवस्था करा..श्रीराम तसेच राहिले होते ना? १८०० झाडं का कापायची ?” त्यांच्या या पोस्टला अनेकांनी झाडं तोडण्यासाठी विरोध दर्शवला आहे. तर काहींनी वृक्षतोडीला समर्थन दिलं आहे. दरम्यान या तोडल्या जाणाऱ्या वृक्षांमध्ये कडूनिंब, चिंच, जांभूळ यांसारखी भारतीय ओळख दर्शविणाऱ्या प्रजातीही सुद्धा आढळल्याचं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. अनेक झाडं इतकी जुनी, मोठी व पसरट आहेत की त्यांची प्राचीन अर्थात हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होऊ शकते.
सयाजी शिंदे यांनीही व्यक्त केला संताप
सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धक आणि पर्यावरणप्रेमी आहेत. नाशकातील तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. कुंभमेळ्यााठी वृक्षतोड होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत थेट इशाराही दिला आहे. सयाजी शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, तपोवनमधली झाडं तोडणं हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आहे. कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यासाठी इतक्या झाडांची कत्तल करणं हे अजिबातच योग्य नाही. एक झाड तोडून दहा झाडे लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी आम्ही १०० माणसं उभी करू, १०० जणांचं बलिदान देऊ. पण ते झाड तोडू देणार नाही, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय. सरकार आपलं असतानाही इतकं बेजबाबदार वागतंय. माझ्या तोंडात आता शिव्या येतायत, इतका राग येतोय की, असं म्हणत शिंदे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.


