
भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम…
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्री गंगानगर येथील २२ एमडी गावातील घडसाणा या सीमावर्ती भागाला भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी लष्कर आणि बीएसएफ अधिकाऱ्यांची भेट घेत दहशतवादाविरुद्ध भारताच्या तयारीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ‘जर पाकिस्तानने दहशतवादाला थारा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जातील. यावेळेस भारतीय लष्कर पूर्वीप्रमाणे संयम दाखवणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे थांबवले नाही, तर ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा लवकरच सुरु केला जाऊ शकतो’, असे लष्करप्रमुखांनी म्हटले.
‘ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारतीय लष्कराने नऊ पाकिस्तान दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. १०० हून अधिक पाकिस्तानी लष्करी जवान आणि असंख्य दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले. या कारवाईचे पुरावे जगाला दाखवण्यात आले आहेत, असे भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय जवानांना आणि स्थानिक नागरिकांना जाते असेही त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते महिलांना समर्पित होते. आता भारत पूर्णपणे तयार झाला आहे. जर ऑपरेशन सिंदूर २.० राबवले तर भारताने ऑपरेशन सिंदूर १.० मध्ये जो संयम बाळगला होता, तो नसेल. यावेळी भारत अशी कारवाई करेल की पाकिस्तानला इतिहासात राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. जर पाकिस्तानला इतिहासजमा व्हायचे नसेल, तर त्यांना दहशतवाद संपवावा लागेल’, असे वक्तव्य लष्करप्रमुख द्विवेदी यांनी केले.
लष्करप्रमुखांनी सांगितले की, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे उभे राहिले होते. जगभरात या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला केला. सात ठिकाणी लष्कराने, तर दोन ठिकाणी हवाई दलाने हल्ला केला. कोणत्याही निष्पाप नागरिकांना मारले जाणार नाही असे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने ठरवले होते. आमचे ध्येय फक्त दहशतवादी अड्डे, त्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि त्यांचे मालक नष्ट करणे हे होते.
नष्ट केलेल्या दहशतवादी अड्ड्यांचे पुरावे भारताने जगाला दाखवले आहेत. जर भारताने पुरावे दाखवले नसते तर पाकिस्तानने हे सर्वकाही लपवले असते. ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारताने जो संयम बाळगला होता तसे यावेळेस करणार नाही. आम्ही अशी कारवाई करू की पाकिस्तानला इतिहासात टिकून राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. जर भारताला जगात आपले स्थान प्रस्थापित करायचे असेल तर दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला ते थांबवावे लागेल, असेही लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले.