
अक्षरशः तुटून पडले !
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या मेळाव्याप्रसंगी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
कदम यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तुटून पडले आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी मंत्री अनिल परब अशी ठाकरेंची अख्खी फौज मैदानात उतरली आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्यानंतर या आरोपांचे खंडन करण्यासाठी व पलटवार करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे काहीजण कदम यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
कदमांना लाज वाटायला हवी : संजय राऊत
शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू या घोषणा करण्याच्या दोन दिवस अगोदर झाला असल्याची माहिती डॉ. पारकर यांनीच त्यांना दिली होती, असा दावा केला होता. या वक्तव्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या स्मृतींचा अपमान करणारे त्यांचे वक्तव्य आहे. असे विधान करताना ‘कदमांना लाज वाटायला हवी’ अशा तीव्र प्रतिकिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात, आम्ही शेवटपर्यंत तिथे होतो.आम्हाला माहीत आहे. आता यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते जर आता उगाळत असतील तर तुम्ही काय करणार ? शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटलं, त्यांचं आता जन्मशताब्दी वर्ष येईल. आणि आता अशा प्रकारची वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे संजय राऊत म्हणाले
रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम झालाय : भास्कर जाधव
‘रामदास कदमला मी छमछमदास, बामदास म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सावली बारमध्ये भडवेगिरी करून त्यांनी पैसे कमावले आहेत, तो बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमासारखा मूर्ख माणूस संपूर्ण महाराष्ट्रात नाही. कदम यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणीच किमंत देत नाही असा आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला आहे.
कदम यांना काहीतरी मानसिक आजार झालाय : अंबादास दानवे
रामदास कदम यांना काहीतरी मानसिक आजार झाला आहे किंवा त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या अत्यंत संवेदनशील विषयावर खोटा आरोप केल्याबद्दल त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
कदमांचे कोकणातले अस्तित्व नामशेष होतेय: सुषमा अंधारे
कदमांचे कोकणातलं अस्तित्व नामशेष होत चाललय. कदमांच्या पोरानं कदमाची सर्व घालवली. आईच्या नावे डान्सबार सुरू केलाय. सतत टक्केवारीचा राजकारण. कोकणात मी सुद्धा आहे हे आटापिटा करण्याच्या नादात कदमांच ते स्टेटमेंट आले आहे. कदम यांना हे आधी कळत नव्हतं का? इतके दिवस ते का गप्प होते? मंत्रीपद का भोगली? कदम आणि आपल्या पोराची तिकीट मागण्याची लाचारी का केली? कदम यांचा खरेपणा इतके दिवस कुठे गेला होता?. उदय सामंत यांच्यापेक्षा मी तुमच्या पेक्षा कसा जास्त वफादार आहे. हे त्यांना दाखवून द्यायचं होते अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
रामदास कदम यांनी माफी मागावी : अनिल परब
रामदास कदम यांनी डॉ. जलील पारकर यांच्या नावाने केलेला दावा सिद्ध करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. रामदास कदम माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याविरोधातील संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तर दुसरीकडे रामदास कदम हा अतिशय फालतू माणूस असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.